
कुडाळ: तालुक्यातील अणाव ग्रामपंचायतमधील उपसरपंचावरील अविश्वास ठराव प्रकरणानंतर ग्रामपंचायतमधील सातही सदस्यांनी राजीनामा द्यावेत असा ठराव मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. या सात सदस्यांमध्ये रावजी कृष्णा जिकमडे, नंदकिशोर तुळशीदास पारकर, मृणाल महेश परब, श्रद्धा गुरुदत्त दळवी, सुवर्णा प्रदीप परब, महिमा महेश जिकमडे, गजानन अशोक कुलकर्णी यांच्या विरुद्ध हा ठराव मांडण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच अणाव उपसरपंच अदिती अणावकर यांच्यावर ग्रामपंचायतमधील सात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार, अणाव ग्रामपंचायत येथे अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले होते. यामध्ये उपसरपंच अदिती अणावकर यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाला होता. त्यामुळे अदिती अणावकर यांचे उपसरपंच पद कायम राहिले. मात्र यानंतर आज झालेल्या ग्रामसभेमध्ये उपसरपंच यांच्यावर अविश्वास टाकणारे ७ ही जण सदस्य गैरहजर राहिले. त्यानुसार, हे सातही सदस्य वॉर्डमध्ये उपस्थित नसतात, लोकोपयोगी कामात सहभाग नसतो असा आरोप सरपंच लीलाधर अणावकर यांनी ग्रामसभेत केला. त्यामुळे आज या सात जणांचा ग्रामस्थांनी निषेध करत त्यांनी राजीनामे द्यावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तसेच उपसरपंचावरील अविश्वास ठराव प्रक्रियेत जो खर्च झाला तो या सातही सदस्यांकडून वसूल करण्यात यावा असाही ठराव मंजूर करण्यात आला आहे.












