उलट्या होऊन बालकाचा आकस्मिक मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 04, 2026 20:44 PM
views 52  views

कणकवली : कणकवली शहरात मंगळवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. भाजीच्या दुकानात गेलेल्या ११ वर्षीय बालकाला अचानक उलट्या होऊन त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. अजय लालू चव्हाण असे या मृत बालकाचे नाव आहे. विशाल चंद्रशेखर जाधव (२५, रा. कणकवली टेंबबाडी) यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अजय हा मूळचा कर्नाटक राज्यातील विजापूर येथील असून, त्याचे कुटुंब सध्या कणकवलीतील कलमठ-गावडेवाडी येथे वास्तव्यास आहे. मंगळवारी ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अजय आपल्या ओळखीच्या प्रतीक डगरे याच्यासोबत भाजीच्या दुकानात गेला होता. दुकानात असतानाच त्याला अचानक मळमळू लागले आणि त्याने उलट्या केल्या. त्यानंतर त्याची प्रकृती बेगाने खालावली.

अजयची अवस्था पाहून त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कोवळ्या बयातील मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.