हत्ती आंदोलनाची रणनीती ठरली !

केर गावात बैठक, तिलारी खोऱ्यात संघर्ष समिती स्थापन होणार
Edited by: लवू परब
Published on: March 04, 2026 20:56 PM
views 17  views

दोडामार्ग :  काजू हंगामात हत्तीच्या मुक्त संचारात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वनविभागाशी  संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असून तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही आमदार, पालकमंत्री, खासदार यांची भेट घेऊन व्यथा कानी घालण्याचा निर्णय केर येथे बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिवाय तिलारी खोऱ्यातील हत्ती बाधित गावांची संघर्ष समिती स्थापन करण्याचे ठरले असून १३ जणांची समिती गठीत करण्यात आली त्यात इतर गावातील नावे सामाविष्ठ करून लवकरच समिती पूर्ण केली जाईल.

केर येथे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या आयोजित बैठकीत शिवसेना नेते राजेंद्र निंबाळकर, शिवसेना सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस, केर उपसरपंच तेजस देसाई, तुकाराम देसाई, रत्नकांत देसाई, हर्षद देसाई, विष्णू देसाई, शिवराम देसाई, सगुण नाईक, शंकर देसाई, मंगेश देसाई, राघोबा देसाई, नारायण देसाई, महेंद्र देसाई, प्रकाश देसाई, अनंत देसाई,  पोलीसपाटील सर्वेश देसाई आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

सुरुवातीला लोकप्रतिनिधी यांची भेट घेणार

आंदोलन करण्यापूर्वी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना जिल्हाव्यापी प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्याचे ठरविण्यात आले. याबाबत आपण खासदार श्री. राणे यांची वेळ घेतो असे श्री. निंबाळकर यांनी सांगितले. 

यापुढे ठोस आश्वासन असेल तरच वनविभागाने यावे

यावेळी ग्रामस्थांनी २०१८ पासून शेतकऱ्यांना हत्ती प्रश्नी असणाऱ्या समस्या याचा पाढा वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ते तेच प्रश्न आणि वनविभागाचेही तेच  उत्तर यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे ग्रामस्थांना भेटायचं असेल तर ठोस निर्णय देणारे अधिकारी हवेत तरच बैठका घ्या असे सांगितले

आता लढा धोरणात्मक निर्णयासाठी

    शेतकरी प्रश्न गेली अनेक वर्षे आहेत. दरवर्षी काजू हंगामात हत्ती येतात वनविभाग काजू नुकसानीची तरतूद नाही म्हणून हात झटकण्याचे काम करते मात्र आता धोरणात्मक निर्णय होण्यासाठी लढा उभारण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.