
दोडामार्ग : बोडदे येथील रहिवासी तुळशीदास उर्फ तुळसो सखाराम जाधव (वय ५२) यांचा मृतदेह बुधवारी दुपारी दोडामार्ग केळीचेटेंब येथील डाव्या कालव्यात आढळून आला. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जाधव यांचा शोध नातेवाईकांकडून सुरू होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
तुळशीदास जाधव हे रविवारी अचानक बेपत्ता झाले होते. खानयाळे रोडलगत कालव्याच्या बाजूला त्यांच्या चप्पला आढळून आल्या होत्या. त्यामुळे ते कालव्यात पडले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. नातेवाईकांनी शोध घेऊनही काहीच धागादोरा लागला नसल्याने दोडामार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद नातेवाईकांनी केली होती. दरम्यान, दोडामार्ग पोलिसांनी तिलारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बुधवारी कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती केली. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नातेवाईक पुन्हा शोध घेत असताना दोडामार्ग केळीचेटेंब येथील कालव्यात जाधव यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस कर्मचारी बाबी देसाई, राजेश गवस, विजय जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून घटनेचा अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.













