
सिंधुदुर्गनगरी : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभीच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद तसेच खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
बालभारतीच्या पोर्टलवरून मागणी नोंदविल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तकांचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आहे. शासनाच्या या योजनेअंतर्गत शासकीय, अनुदानित प्राथमिक तसेच खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार २०४ विद्यार्थ्यांसाठी एकूण २ लाख २९ हजार २७३ पाठ्यपुस्तक संचांची व्यवस्था करण्यात आली असून तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार असल्याने त्यांच्या अभ्यासाला तत्काळ सुरुवात होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ५४ हजार ९५३ पाठ्यपुस्तक संचांचे वितरण करण्यात आले असून त्यापाठोपाठ कुडाळ तालुक्यासाठी ६० हजार ९१४ आणि कणकवली तालुक्यासाठी ४८ हजार ६३६ संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या व्यतिरिक्त मालवण तालुक्यात ३२ हजार३८५ संच, देवगड ४३ हजार३५४ संच, वेंगुर्ला २५ हजार ०३० संच , वैभववाडी १४ हजार ६४१ संच, तर दोडामार्ग तालुक्यात १३ हजार ६३० पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले आहे . जिल्ह्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून इंग्रजी माध्यम ४,५३५ संच व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ७,९५४ संच यामध्ये समावेश आहेत,
दरम्यान, इयत्ता सहावीची पाठ्यपुस्तके अद्याप छपाई प्रक्रियेत असल्याने ती उपलब्ध होताच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमदी यांनी दिली.











