LIVE UPDATES

शिक्षणामुळेच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची उन्नती शक्य

डॉ. आनंद बांदेकर यांचे प्रतिपादन ; वेंगुर्ल्यात भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 16:06 PM
views 126  views

वेंगुर्ले: समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात असल्याने विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचेही भान ठेवावे. भंडारी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत असून समाजाने अशा गुणवंतांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शिक्षणामुळेच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची उन्नती शक्य असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांनी वेंगुर्ले येथे केले. 

    भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित "भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ – २०२६" उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. साई दरबार हॉल, वेंगुर्ला येथे झालेल्या या कार्यक्रमात भंडारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला, तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी  भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष,माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर बोलत होते.

    कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव (भाऊ) आंदुर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेविका लीना म्हापणकर, गजानन गोलतकर, डॉ. गोविंद धुरी, श्रेया मयेकर, सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, रमेश नार्वेकर, विकास वैद्य, सदानंद केरकर, दीपक कोचरेकर, श्रेया मांजरेकर, राजेंद्र कांबळी, भरत आवळे, गुरुनाथ कांबळी, आत्माराम सोकटे, गोपाळ अणसूरकर आणि बाळू फटनाईक यांच्यासह समाजातील अनेक ज्येष्ठ व मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

  समाजातील शिक्षण, कला,उद्योग, समाजसेवा, संशोधन, विधी, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी मानपत्र, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर, रमेश पुंडलिक नार्वेकर, डॉ. सचिन वासुदेव परुळकर, डॉ. गोविंद प्रकाश धुरी, शैलजा सचिन परुळकर, प्रा. शिवानी रोकडे- बांदेकर, ॲड. उत्कर्षा नारायण गोडकर, ॲड. नेहा आनंद बांदेकर, सी.ए. जान्हवी महेश अणसूरकर, विवेक रविंद्र तिरोडकर, रामा वासुदेव पोळजी, विश्वनाथ कांबळी,श्रावणी राजन अरावंदेकर आणि ऋग्वेद गोडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

      यावेळी भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या मान्यवरांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर आणि नगरसेविका लीना म्हापणकर यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समाजाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

     यावेळी बोलताना उद्घाटक महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांकडे करिअरची सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी आपल्या मनोगतात भंडारी समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. शिक्षण हेच यशाचे सर्वात प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. खजिनदार सुरेश बोवलेकर यांनी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या कार्याचा आढावा घेत व्यासायिक शिक्षण घ्या, नोकरी देणारे बना असे आवाहन केले.

      याशिवाय इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास भंडारी समाजातील ज्येष्ठ नागरिक, समाजबांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार सचिव डॉ. गोविंद धुरी यांनी मानले.