
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनंतर शासनाने ही नियुक्ती मंजूर केली असून, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा, विविध शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, आरोग्य सुविधा बळकटीकरण तसेच लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीमध्ये वैभववाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी श्रद्धा रावराणे यांना मिळाली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रद्धा रावराणे म्हणाल्या, "या महत्त्वपूर्ण समितीवर सदस्य म्हणून संधी दिल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार. या पदाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे कार्य करणार आहे."










