LIVE UPDATES

रोह्यात वाढीव पाणीपट्टीविरोधात उबाठाचे आमरण उपोषण

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रोहा पाणीदरात 'नंबर वन'; राजेश कापरे यांचा सवाल ?
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 11:25 AM
views 66  views

रोहा , प्रतिनिधी : 

रुपेश रटाटे 

रोहा नगरपालिकेने लागू केलेल्या वाढीव पाणीपट्टी दरांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, तालुकाप्रमुख राजेश कापरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत रोहा शहरातील पाणीपट्टीचे दर सर्वाधिक असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

यावेळी बोलताना राजेश कापरे यांनी, "अलिबाग, पेन आणि महाड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही एवढी मोठी दरवाढ करण्यात आलेली नाही. मग रोहा शहरातच एवढी मोठी वाढ का करण्यात आली? या वाढीमागील नेमके कारण काय?" असा सवाल उपस्थित केला.

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पाणीपट्टी दर आणि रोहा नगरपालिकेतील दर यामध्ये मोठी तफावत असल्याचा मुद्दा मांडत, "प्रशासक कार्यकाळात यापूर्वी हे दर वाढविण्यात आले नाहीत, मग आता अचानक नागरिकांवर आर्थिक भार का टाकला जात आहे?" असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

रोहेकरांच्या खिशाला परवडणार नाही अशा पद्धतीने पाणीपट्टी दरवाढ करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना उ. बा. ठा. गटाने या निर्णयाचा तीव्र विरोध नोंदविला आहे. वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, उपोषणाच्या सुरुवातीलाच आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली असून आंदोलन शांततेत सुरू असल्याचे सांगण्यात आले.यावेळी आंदोलनस्थळी "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आता या आमरण उपोषणाची प्रशासनाकडून कितपत दखल घेतली जाते, वाढीव पाणीपट्टी दर कमी होणार का आणि रोहेकरांना दिलासा मिळणार का..? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या आंदोलनाचा नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.