LIVE UPDATES

35 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटी फळपीक विमा रक्कम जमा

भाजप नेते सतीश सावंत यांची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 12:25 PM
views 1908  views

सिंधुदुर्ग : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 35 हजार आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 86 कोटी रुपयांची विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे.पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे विमा कंपनींसोबत आढावा बैठकीमुळे जुलै मध्येच शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली आहे, अशी माहिती भाजपचे नेते , माजी बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

कणकवली येथील खा. नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, जिल्ह्‌यातील आंबा , काजू शेतक-यांना दरवर्षी ही विमा रक्कम साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मिळते. मात्र, यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विमा रक्कम लवकर वितरित करण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे प्रथमच जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांचे तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आभार मानत असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. 

जिल्ह्यात आंबा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार ते 95 हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळाली आहे. मात्र काजू पिकाच्या काही बाबींमध्ये अद्याप अडचणी असून, जिल्ह्यातील काही हवामान केंद्रे सदोष असल्यामुळे विमा मंजुरीवर परिणाम होत आहे. या विषयावर लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हवामान केंद्रांची संख्या वाढविण्याचीही आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी भविष्यात कोणतीही अडचण टाळण्यासाठी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी. यापूर्वी ई-पीक पाहणी न झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदी वेळेत करून घ्याव्यात, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.

तसेच, ज्यांच्या जुन्या विमा दाव्यांची रक्कम अद्याप मिळालेली नाही, त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अशा प्रकरणांचा पाठपुरावा सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षातील काही शेतक-यांनी पीकविमा मिळाला नसल्याने त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याशीही पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यातील 57 हवामान केंद्रातील 5 हवामान केंद्रे सदोष आहेत. त्यामुळे फोंडासह काही मंडलांमध्ये शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित पीकविमा कंपनींशी बैठका घेण्यात येणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.