
सिंधुदुर्गनगरी : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
सुरक्षितेतेविषयक सूचना :- ज्या किनाऱ्यांवर लाईफगार्ड नियुक्त केलेले आहेत त्यांच्या परवानगीशिवाय समुद्रात उतरू नये. स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे. एकट्याने समुद्रात उतरणे टाळावे, लहान मुलांवार विशेष लक्ष ठेवावे. उच्च लाटा, खोल पाणी व Rip Current बाबतच्या सूचनांची माहिती घेऊनच समुद्रात उतरावे. हवामान खात्याचा इशारा असल्यास समुद्रात उतरणे टाळावे.
प्रतिबंधात्मक सूचना :- मद्यप्राशन करुन समुद्रात उतरु नये. समुद्रात प्लास्टिक, काच किंवा अन्य धोकादायक साहित्य नेऊ नये. रात्री उशिरा समुद्रात उतरणे टाळावे. परवागीशिवाय बोटींग,जेट स्की, पॅरासेलिंग इ. जलक्रिडा करु नयेत. भरती- ओहोटीच्या वेळांची माहिती घेऊनच समुद्रकिनारी जावे.
कुटुंब व मुलांसाठी सूचना :- लहान मुलांना हात धरुनच पाण्यात न्यावे. मुलांना लाईफ जॅकेट, फ्लोटरशिवाय खोल पाण्यात जाऊ देऊ नये. वृद्ध व आजारी व्यक्तींनी खोल पाण्यात उतरु नये.
आपत्कालीन व आरोग्य सूचना :- कोणतीही दुर्घटना घडल्यस तात्काळ लाईफगार्ड, पोलीस, हेल्पलाईनवर संपर्क साधावा. जखम झाल्यास जवळच्या प्राथमिक उपचार केंद्राचा वापर करावा.
स्वच्छता व पर्यावरण संरक्षण :- समुद्रकिनारा स्वच्छ ठेवावा, कचरा निर्धारित कचरापेटतच टाकावा. समुद्री जीवसृष्टी, शंख-शिंपले व कासवांची अंडी यांना इजा करु नये. ध्वनीप्रदूषण व गैरवर्तन टाळावे.
कायदा व शिस्त:- प्रशासन, पोलीस व लाईफगार्ड यांच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.













