
सिंधुदुर्ग : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेन स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा स्टार प्रचाराकांमध्ये समावेश झाला आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार निलेश राणे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने मुंबईसह संपूर्ण राज्यात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे.
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत स्टिंग ऑपरेशन, भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीतील पैसे, जात प्रमाणपत्र यासह अनेक राजकीय मुद्यांवर थेट भाष्य करत आमदार निलेश राणे हे राज्यात चर्चेत आले होते. मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवल्यानंतर शिवसेनेन निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेन स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. त्यात आमदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.













