
सावंतवाडी : शहारातील उपरलकर स्मशानभूमी समोरील स्मशानभूमीत चक्का दारूसह गांजा, ड्रग्स सेवन केलं जातं असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केला आहे. आज थेट स्मशानभूमीत जात त्यांनी ऑन रेकॉर्ड ही गंभीर बाब उघडकीस आणली असून पोलिस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन झोपलय का ? असा सवाल केला आहे.
येथील उपरलकर स्मशानभूमीत श्री. तोरसकर यांनी जात पंचनामा केला. यावेळी ते म्हणाले, उपरलकर स्मशानभूमी समोरील दफन स्मशानभूमीच्या जागेत विधी करण्याच्या इमारतीत कॉलेज युवक ड्रग्स, गांजा, दारूच सेवन करतात. आज प्रत्यक्ष घटनास्थळी १०-१२ युवक दारूच सेवन करत होती. शहरातील नवीन पिढी व्यसनाधीन होत असून अवैध गोष्टींना कुणी विरोध करत नाहीत. मात्र, आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. नगरपरिषदेत झालेल्या पैशांच्या वाटपानंतर कुणीच अवैध धंदे, अन्यायावर आवाज उठवताना दिसत नाही. मात्र, आम्ही यावर बोलत राहू अन्यायाला वाचा फोडू, जनता आमच्यासोबतही आहे. प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आणत राहू असा इशारा त्यांनी दिला. तसेच पोलिस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन झोपल आहे का ? असा सवाल केला. नगरपरिषद कर्मचारी मारूती निरवडेकर तिथे प्रामाणिक सेवा देत असताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत सावंतवाडीकरांनी असे प्रकार खपवून घेऊ नये, सावंतवाडीचा सजक नागरिक म्हणून मी या गोष्टी उघड करेन असा इशारा त्यांनी दिला.













