LIVE UPDATES

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात एस.एस.पी.एम. हॉस्पिटलची ओपीडी सेवा सुरू

पहिल्याच दिवशी डॉ. संजीव आकेरकर यांनी दिली रुग्णसेवा : आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 19:51 PM
views 39  views

वेंगुर्ले :  आरोग्याबाबत वेंगुर्लेतील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या तर्फे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात (SDH) मोफत बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आठवड्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

या सेवेच्या सोमवारी पहिल्याच दिवशी डॉ. संजीव आकेरकर हे रुग्णांच्या सेवेसाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी डॉ. आकेरकर यांचे स्वागत केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, संकेत धुरी तसेच भाजपा युवा मोर्चाचे तुषार साळगावकर, वेंगुर्ले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या मोफत ओपीडीमध्ये सोमवार ते शनिवार विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

यामध्ये मेडिसिन, न्यूरो फिजिशियन, नेफ्रॉलॉजी, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, जनरल सर्जरी, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग व दंतचिकित्सा आदी विभागांचा समावेश आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा उपलब्ध राहणार असून रुग्णांना पूर्णपणे मोफत तपासणीचा लाभ मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

वेंगुर्ले येथील आरोग्य सेवा चांगली राहावी यासाठी डॉक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे  तसेच एस.एस.पी.एम. हॉस्पिटलचे नागरिकांतून आभार व्यक्त केले जात आहेत.