
वेंगुर्ला: ग्रामपंचायत पेंडूरचे सरपंच संतोष दशरथ गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सेवा संकल्प अभियान' व 'माझा गाव आरोग्य संपन्न गाव' या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोफत आरोग्य शिबिर तसेच १५ वा वित्त आयोग सन २०२५-२६ अंतर्गत कौशल्य विकास/शिवण क्लासचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १० महिला लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सरपंच संतोष गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रफुल्लकुमार शिंदे, पशुसंवर्धन विभाग अधिकारी श्री देसाई, सभापती, उपसभापती स्वीय सहाय्यक महेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सरपंच संतोष दशरथ गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रा प सदस्य समीक्षा तांडेल, निलेश नाईक, सुलोचना परब, रंजना हर्जी, तंटामुक्ति अध्यक्ष उमेश सावंत, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, पोलीस पाटील श्याम नेमण, श्रद्धा वैद्य यांच्यासहित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पोस्ट कर्मचारी, मित्रपरिवार आणि महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या दिवशी केवळ औपचारिक सत्कार न करता, १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी १० पात्र महिला लाभार्थ्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या. याशिवाय 'माझा गाव आरोग्य संपन्न गाव' मोहिमेअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा गावातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. उपस्थित सर्व मान्यवरांनी सरपंच संतोष गावडे यांच्या या स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी व सामाजिक कार्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या.












