LIVE UPDATES

रणरणत्या उन्हात निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी

चिपळूणात महाविकास आघाडी रस्त्यावर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 17:48 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update#

चिपळूण  : निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी चिपळूण महाविकास आघाडीतर्फे आज, बुधवारी रणरणत्या उन्हात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.

आमदार भास्कर जाधव, माजी आमदार हुसैन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर जीप्सी कॉर्नरसमोर झालेल्या सभेत आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसैन दलवाई आदींची तडाखेबंद भाषणे झाली. त्यानंतर हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि सरकारविरोधी घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली.

चिंचनाका-भोगळेमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर दाखल झाला. तेथे मान्यवर नेत्यांनी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्यासमोर आपली भूमिका मांडून रीतसर निवेदन सादर केले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग, आशिष जाधव, भरत लपदे, ठाकरे सेनेचे बाळा कदम, शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, बारकेशेठ बने, अविनाश कोळसकर, शिरीष काटकर, इम्तियाज मुकादम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चिपळूणचे डीवायएसपी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात उत्तम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उन्हाची काहिली असतानाही या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला.