
कुडाळ : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्यंत खडतर अशा 'आयर्नमॅन ७०.३' या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा सुपुत्रांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातून इतक्या मोठ्या संख्येने 'आयर्नमॅन' होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या ट्रायथलॉन स्पर्धेत स्पर्धकांना १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग करणे आणि २१.१ किलोमीटर धावणे हे तिन्ही क्रीडाप्रकार कोणतीही विश्रांती न घेता सलग ८ तास ३० मिनिटांच्या आत पूर्ण करावे लागतात. यासोबतच प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र वेळमर्यादेचे कडक निकष असतात. हे सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकालाच प्रतिष्ठेचा 'आयर्नमॅन' हा किताब बहाल केला जातो.
या स्पर्धेत सिंधुदुर्गातील तीन खेळाडूंनी वैयक्तिक गटात, तर एका संघाने सांघिक (रिले) गटात ही आव्हानात्मक शर्यत पूर्ण केली. पावशी (ता. कुडाळ) येथील श्री. प्रमोद भोगटे यांनी सलग दुसऱ्या वर्षी हा किताब पटकावत आपल्या फिटनेसचा आणि जिद्दीचा प्रत्यय दिला. त्यांच्यासोबत कुडाळचे डॉ. सौरभ पाटील आणि सावंतवाडीचे डॉ. रवी गोलघाटे यांनीही वैयक्तिक गटातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत 'आयर्नमॅन' होण्याचा बहुमान मिळवला. परुळे (ता. कुडाळ) येथील डॉ. प्रशांत सामंत, कुडाळचे श्री. रुपेश तेली आणि ओरोस येथील श्री. प्रकाश वराडकर यांनी 'सिंधुफायटर्स' या संघाच्या माध्यमातून सहभागी होत ही शर्यत यशस्वीरित्या फत्ते केली. इच्छाशक्तीच्या जोरावर या सहाही जणांनी सिंधुदुर्गचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








