
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे. शहरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे व्यापारी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला असून, रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशीच काही दुकानांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आठवडा बाजार हा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असताना नेमक्या याच दिवशी वीज गायब होते आणि महत्वाच म्हणजे इथले अधिकारी व कर्मचारी आपले फोन बंद करून सुशेगात आहे. याचा मोठा परिणाम व्यवसायावर होत आहे.
दोडामार्ग शहरात गेल्या काही काळापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. कधी अचानक वीज जाते, तर कधी बराच वेळ वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. अनेक व्यवसायांमध्ये विजेवर अवलंबून असलेली उपकरणे, यंत्रणा आणि इतर सुविधा बंद पडतात. परिणामी ग्राहकांची गैरसोय होण्याबरोबरच व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे, रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी काही दुकानांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला. आठवडा बाजाराच्या दिवशी शहरात ग्राहकांची मोठी गर्दी असते. अशा महत्त्वाच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर पाणी फेरण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकारावर दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसेल, तर सामान्य व्यापाऱ्यांनी दाद मागायची कोणाकडे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वीज विभागातील अधिकारी वारंवार सुट्टीवर जातातच कसे? नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या समस्यांचे काय? प्रभारी चार्ज असल्याने ही परिस्थिती असून शहरातील वीजपुरवठा विस्कळीत होत असताना त्याकडे लक्ष देणारे कोणीच नाही काय? या समस्येबाबत संबंधितांना काहीच सोयरसुतक नाही काय? अशा संतप्त प्रश्नांच्या माध्यमातून नानचे यांनी वीज विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न केवळ एखाद्या दिवसापुरता मर्यादित नसून, वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे वीज विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन व्यवसायाच्या वेळेत वीज गायब होत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ग्राहकांची गैरसोय आणि व्यापाऱ्यांचे नुकसान याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
वीज विभागाने केवळ तांत्रिक अडचणींचे कारण पुढे न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
दोडामार्ग शहरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणारच, असा इशारा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दिला आहे. व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि नागरिकांची गैरसोय याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आता तरी वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोडामार्ग शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा व्यापाऱ्यांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दोडामार्गकरांना सुरळीत वीजपुरवठा मिळणार तरी कधी? आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे आता वीज विभागाला द्यावी लागणार आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








