LIVE UPDATES

अंगात देव येण्याची बतावणी | अंनिसचा दणका

भोंदूगिरी बंद करण्याचा लेखी माफीनामा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 15, 2026 06:38 PM
views 43  views

कुडाळ :  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अशा अनेक भोंदूंचा पर्दाफाश करून त्यांची भोंदूगिरी बंद करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे समितीच्या कारवाईचा धसका घेतलेल्या काही भोंदूंनी दिवसा सुरू असलेले उद्योग बंद करून रात्रीच्या वेळी आपले प्रकार सुरू केल्याचे समोर येत आहे. असाच एक प्रकार कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे उघडकीस आला. कुडाळ येथे वास्तव्यास असलेले संतोष म्हाडगूत हे आपल्या भावाच्या घरी वाडोस येथे जाऊन अंगात देव येत असल्याची बतावणी करून लोकांच्या समस्या सोडविण्याचा दावा करीत असल्याची माहिती अंनिसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले यांना मिळाली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी कुडाळ येथे वास्तव्यास असताना संतोष म्हाडगूत हे अंगात देव येत असल्याचे भासवून लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रकार करीत होते. मात्र, तेथील जागरूक नागरिकांनी त्यांची भोंदूगिरी बंद पाडली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ते आपल्या भावाच्या घरी वाडोस येथे रात्रीच्या वेळी हा प्रकार सुरू ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती समितीला मिळाली.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर ॲड. राजीव बिले यांनी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांच्याशी चर्चा करून भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. त्यानुसार समितीचे सचिव अजित कानशिडे, विजय चौकेकर आणि विलास चेंदवणकर यांच्यासह त्यांनी रात्री उशिरा वाडोस येथे धडक दिली.

यावेळी मंगेश म्हाडगूत यांच्या घरी भक्तांची मोठी गर्दी जमली होती. दूरवरून आलेले लोक रात्रीच्या वेळी आपल्या समस्या घेऊन तेथे उपस्थित होते. संतोष म्हाडगूत यांच्या अंगात पूर्वजांचे वारेसूत्र आल्याचे भासविले जात होते, तर त्यांच्या मदतीला आनंद म्हाडगूत यांच्या अंगातही वारेसूत्र आल्याचे दाखविले जात होते. दोघेही मिळून आपल्यात अलौकिक शक्ती असल्याचा आभास निर्माण करीत होते. भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून त्यांना विभूती देऊन खाण्यास सांगितले जात होते, तसेच विविध प्रकारचे उपाय सुचविले जात होते.


दरम्यान, ॲड. राजीव बिले व समितीचे अन्य सदस्य तेथे पोहोचल्याची चाहूल लागताच अंगात वारेसूत्र आल्याचा दावा करणाऱ्यांचा हा प्रकार थांबला. यानंतर अंनिसच्या सदस्यांनी संतोष म्हाडगूत आणि आनंद म्हाडगूत यांना ऐंशी लाख रुपयांचे आव्हान दिले. आपल्या अंगात खरोखरच अलौकिक शक्ती संचारत असेल, तर समिती विचारेल त्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावीत; अन्यथा लोकांची दिशाभूल करणारी भोंदूगिरी कायमची बंद करावी, असे आव्हान त्यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी त्यांना महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती दिली. या कायद्यानुसार होणारी कारवाई, शिक्षा आणि दंड याबाबत समजावून सांगितले. उपस्थित भाविकांनाही या कायद्याची थोडक्यात माहिती देण्यात आली. कायद्यानुसार होऊ शकणारी कारवाई लक्षात घेऊन संतोष म्हाडगूत आणि आनंद म्हाडगूत यांनी ऐंशी लाख रुपयांचे आव्हान स्वीकारले नाही. उलट, आपल्यात कोणतीही अलौकिक शक्ती संचारत नसल्याचे मान्य करीत आजपासून लोकांची फसवणूक करणारे असे प्रकार बंद करणार असल्याचा लेखी कबुलीजबाब समितीच्या सदस्यांना दिला.

छोट्या-मोठ्या समस्यांसाठी अशा भोंदूबाबांकडे जाऊन स्वतःची फसवणूक करून घेण्यापेक्षा समस्यांचे मूळ कारण शोधावे, विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारावा आणि वैज्ञानिक विचारांच्या आधारे आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केले आहे.  


ताजी बातमी

View all

सिंधुपुत्रांची सातासमुद्रापार झेप
November 15, 2026
साळगांव मळावाडीत दिवाळी किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
November 15, 2026
आदिवासी समाजाला सन्मानाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी
November 15, 2026
दोडामार्ग शहरात विजेचा लपंडाव | हजारोंचा व्यवसाय बुडाला
November 15, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुपुत्रांची सातासमुद्रापार झेप
November 15, 2026
साळगांव मळावाडीत दिवाळी किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
November 15, 2026
आदिवासी समाजाला सन्मानाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी
November 15, 2026
दोडामार्ग शहरात विजेचा लपंडाव | हजारोंचा व्यवसाय बुडाला
November 15, 2026