LIVE UPDATES

साळगांव मळावाडीत दिवाळी किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 15, 2026 06:21 PM
views 20  views

कुडाळ : दिवाळीच्या सणानिमित्त लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, गड-किल्ल्यांचा वारसा जपला जावा आणि बालचिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रभात मित्र मंडळ, मळावाडी साळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी किल्ले स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवकालीन इतिहास आणि गड-किल्ल्यांचा वारसा जपण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रेरणादायी ठरला आहे.

या स्पर्धेत मोठ्या गटातून  कु. त्रिशा सदाशिव घाग व कु जिविका सदाशिव घाग यांनी बनवलेल्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळवला.   कु.आयुष सतीश सावंत (किल्ला: सिंधुदुर्ग) याने द्वितीय क्रमांक पटकावला.  छोट्या गटातून साईश पांडुरंग सावंत (किल्ला तोरणा ) याने प्रथम क्रमांक, तर वेदांत नामदेव घाग (किल्ला प्रतापगड ) याने द्वितीय क्रमांक, उत्तेजनार्थ कु. प्रसन्न पांडुरंग पालकर (किल्ला: राजगड)

अर्णव सहदेव नेवाळकर (किल्ला: रायगड) कु. दुर्वेश वासुदेव नाईक (किल्ला: पन्हाळा) यांनी मिळविला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मळावाडी परिसरातील स्पर्धकांनी आपल्या अंगणात माती, दगड तसेच विविध नैसर्गिक साहित्यांचा वापर करून आकर्षक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्पर्धेच्या परीक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, प्रसिद्ध कीर्तनकार तथा दुर्ग अभ्यासक हृदयनाथ गावडे आणि शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती  दुर्गराज रायगडचे सचिव वैभव पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ल्यांची पाहणी केली.

किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, कल्पकता, सजावट तसेच नैसर्गिक साहित्याचा वापर अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत दोन वयोगट निश्चित करण्यात आले होते. ५ ते १६ वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी छोटा गट, तर १६ वर्षांवरील स्पर्धकांसाठी मोठा गट ठेवण्यात आला होता. प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना मंडळाच्या वतीने प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ स्पर्धा आयोजित करण्यापुरता मर्यादित न राहता मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १ मे २०२७ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी पासून प्रथमच सुरू केलेल्या प्रभात मित्र मंडळ, मळावाडी साळगाव यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये शिवइतिहासाविषयी अभिमान आणि जिव्हाळा निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. दिवाळीत किल्ले स्पर्धा शहरीभागात मोठ्या प्रमाणात आयोजित होत असतात. मात्र साळगांव मध्ये ग्रामिण भागातील मुलांमध्ये शिवप्रताप व शौर्य जागृत करणारा हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे. शिवभक्तांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला. यात त्रिशा व कु. जिविका घाग यांनी किल्ले सिंधुदुर्गची प्रतिकृती हूबेहुब साकारत  किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शिवछत्रपतींच्या स्वप्नातील हिंदवी राष्ट्र अर्थात हिंदूराष्ट्राचा ध्वज फडकत असून यामाध्यतून तिने हिंदूराष्ट्राचा संदेश दिला आहे.  यावरून बालमनावर शिवछत्रपतींचे हिंदू राष्ट्राचे विचार बिंबत असल्याचे अधोरेखित झाले आहे. मंडळाच्या वतीने सर्व विजेत्यांचे व मार्गदर्शक परीक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.