
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त गवताचा चारा दुष्काळी भागातील पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. या अनुषंगाने कसाल येथील सरपंच यांच्या स्वमालकीच्या जमिनीवरील गवत कापणी प्रात्यक्षिकास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नैसर्गिकरीत्या उपलब्ध गवताची कापणी करून त्याचा पेंढा बांधण्याचे प्रात्यक्षिक महिला बचत गटातील महिलांनी सादर केले.
या उपक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कसालचे सरपंच, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त तसेच जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. यावेळी गवत कापणी, त्याचे पेंढे बांधणे आणि कापलेला चारा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या गवताचा योग्य वापर करून त्याचे पशुधनासाठी उपयुक्त चाऱ्यात रूपांतर करणे, तसेच हा चारा योग्य पद्धतीने साठवून त्याची गुणवत्ता टिकविणे यावर यावेळी भर देण्यात आला. गवताची कापणी केल्यानंतर त्याचे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी आणि आवश्यकतेनुसार योग्य वेळी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त गवताचा चारा दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना पाठविण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. या माध्यमातून दुष्काळी भागातील पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग पशुधनाच्या चारा व्यवस्थापनासाठी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन आणि चारा उपलब्धता हा महत्त्वाचा विषय असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त गवताचा नियोजनबद्ध वापर करून गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांनी चारा जाळू नये तसेच वाया जाऊ देऊ नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








