
सिंधुदुर्गनगरी/लवू म्हाडेश्वर : सरहद्दीने जोडलेले दोन प्रदेश... संस्कृतीने एकरूप झालेली दोन मने... आणि आता विकासाच्या नव्या दुव्याने जोडला जाणारा गोवा-सिंधुदुर्ग! रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानसेवा आणि समुद्राने जवळ आलेल्या या दोन प्रदेशांना पर्यटन आणि कोकणी संस्कृतीने आधीच भावनिक नाते दिले आहे. आता याच नात्याला जलवाहतूक, जहाजबांधणी, सागरी उद्योग आणि रोजगाराची आर्थिक दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सिंधुदुर्गचा १२० किलोमीटरचा किनारा, खाड्या, नदीमुखे आणि समुद्री साधनसंपत्ती ही जिल्ह्याची ताकद असून तिचा शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य वापर झाला, तर समुद्र विकासाचा ‘आर्थिक महामार्ग’ ठरू शकतो.
सिंधुदुर्गच्या विकासाची भक्कम पायाभरणी करून जिल्ह्याला देशाच्या पर्यटन नकाशावर नेण्याचे काम माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केले. त्याच विकासदृष्टीला पुढे नेत महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यटनाच्या पलीकडे जाऊन समुद्राकडे उद्योग आणि रोजगाराच्या संधींचे प्रवेशद्वार म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.
गोव्यातील सागरी विकासाचा प्रत्यक्ष अभ्यास करून सिंधुदुर्गच्या क्षमतेला अनुरूप स्वतंत्र मॉडेल उभे करण्याच्या दिशेने त्यांनी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून सागरी विकासाला मिळणाऱ्या पाठबळामुळे या अभ्यासाचे रूपांतर धोरण आणि प्रकल्पांमध्ये होण्याची अपेक्षा आहे.
आम. निलेश राणे आम. दीपक केसरकर हेही आपल्या मतदारसंघातील पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार, उद्योजक आणि नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेत असून जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्री नितेश राणे यांना पाठबळ देत आहेत.
कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, किनारपट्टी, नैसर्गिक खाड्या, मत्स्यव्यवसाय, आंबा-काजू उद्योग आणि मुंबई- कोल्हापूर- गोवा- कर्नाटक बाजारपेठांशी असलेली जवळीक यामुळे सिंधुदुर्गकडे पर्यटनापलीकडेही आर्थिक क्षमता आहे. याच क्षमतेतून जलपर्यटनासोबत जलवाहतूक, बोटबांधणी, जहाज दुरुस्ती, मरीन इंजिन दुरुस्ती, फायबर व ॲल्युमिनियम बोट निर्मिती, सागरी उपकरणे आणि मत्स्यप्रक्रिया अशा उद्योगांची साखळी उभी राहू शकते.
जहाजबांधणीबरोबरच जहाज दुरुस्ती क्षेत्रात मोठी संधी आहे. मच्छीमारी नौका, पर्यटन बोटी, फेरीबोटी, स्पीडबोटी आणि लहान व्यावसायिक नौकांच्या दुरुस्तीची व्यवस्था उभी राहिल्यास वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, फायबर तंत्रज्ञ, मरीन इंजिनिअर, सुरक्षा कर्मचारी आणि लॉजिस्टिक्ससह सेवा क्षेत्रातही रोजगार निर्माण होऊ शकतो. एक शिपयार्ड आणि त्याभोवती अनेक पूरक उद्योगांची औद्योगिक परिसंस्था उभी राहू शकते. त्यासाठी जमीन, जेट्टी, ड्राय डॉक, शिपलिफ्ट, वीज, पाणी, रस्ते आणि आवश्यक परवानग्या उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी नुकताच गोवा शिपयार्डचा दौरा केला. १९५७ मध्ये स्थापन झालेल्या गोवा शिपयार्ड ली ने जहाजबांधणीबरोबर डिझाईन, दुरुस्ती, रिफिट आणि आधुनिकीकरणाच्या क्षेत्रात क्षमता विकसित केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील या संस्थेने भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी विविध जहाजे तयार केली आहेत. अधिकृत माहितीनुसार २०० पेक्षा अधिक जहाजे आणि १०० पेक्षा अधिक अद्ययावत जहाज निर्मितीचा अनुभव शिपयार्डकडे आहे. जहाजबांधणीभोवती इंजिनिअरिंग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल, मरीन उपकरणे, दुरुस्ती, प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक्सचे उद्योग उभे राहू शकतात, हा सिंधुदुर्गसाठी महत्त्वाचा धडा आहे.
गोव्याच्या अंतर्गत जलवाहतुकीचाही अभ्यास करण्यात आला. मांडवी, झुआरी, साळ, तेरेखोल आणि चपोरा जलमार्गांवरील फेरी सेवांमुळे प्रवासी आणि वाहन वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्गातील खाड्या आणि नदीमुखांचा योग्य अभ्यास करून स्थानिक फेरी सेवा विकसित केल्यास पर्यटनासोबत नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीलाही फायदा होऊ शकतो.
नवउद्योजकांना संधी
सिंधुदुर्गला केवळ पर्यटन जिल्हा न ठेवता सागरी अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणून नवी ओळख देण्याची ही संधी आहे. सरकार पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक पाठबळ देऊ शकते; मात्र स्थानिक उद्योजक, युवक, तांत्रिक तज्ज्ञ, मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनीही या संधींचे उद्योगात रूपांतर करणे आवश्यक आहे.
पर्यटन, जलवाहतूक,सागरी उद्योग,रोजगार अशी चौकट तयार झाली, तर गोवा-सिंधुदुर्गचे नाते विकासाचे नवे भागीदारी मॉडेल ठरू शकते. व यात फार मोठी उद्योजकांना संधी आहे. यासाठीच या अभ्यासदौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, संतोष कानडे, डॉ. अमोल तेली यांच्यासह सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी सहभागी केले होते.
समुद्र विकासाचे नवे सर्किट!
आरोंदा तळवणे येथे एका जहाज निर्मिती उद्योगाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.
कर्ली ते तारकर्ली हा प्रायोगिक जलवाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला असून प्रवासी जलवाहतुकीसाठी ई-बोटी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. नागरिकांसह पर्यटकांना जलवाहतुकीचा नवा अनुभव देतानाच शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आधुनिक जलसुविधांची जोड देण्याचा प्रयत्न आहे.
पुढील टप्प्यात मालवण–सिंधुदुर्ग किल्ला जलपर्यटन हब, देवगड–विजयदुर्ग मरीन उद्योग व जहाज दुरुस्ती, वेंगुर्ला–निवती–शिरोडा वॉटर टॅक्सी व पर्यटन जलमार्ग, खाड्या व नदीमुखांमध्ये स्थानिक फेरी सेवा विकसित करण्याची शक्यता आहे. यासोबत फायबर-ॲल्युमिनियम बोट निर्मिती, मरीन उपकरणे, कोल्ड चेन, मत्स्यप्रक्रिया, मरीन तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण, जेट्टी, शिपलिफ्ट व दुरुस्ती केंद्रे उभारल्यास ‘गोवा-सिंधुदुर्ग सागरी पर्यटन व उद्योग सर्किट’ आकार घेऊ शकते. यासाठी मंत्री नितेश राणे पुढाकार घेत आहेत.











