LIVE UPDATES

Malvan bike accident : मालवणमध्ये अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू

देवली पुलानजीक दुचाकीचा भीषण अपघात : एक गंभीर जखमी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 16, 2026 12:36 PM
views 580  views
Two children killed in a bike accident near Devli Bridge in Malvan

मालवण : तालुक्यातील देवली पुलानजीक काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, यात ओंकार भावा निकम (वय- १२) आणि राजू अर्जुन निकम (वय-१०) या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सचिन अंकुश निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तात्काळ पुढील वैद्यकीय उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक पंडित पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक आप्पा लुडबे आणि शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला व मदतकार्य पार पाडले. हा अपघात नेमका कशामुळे आणि कसा घडला, याचा सखोल तपास मालवण पोलिसांकडून सुरू आहे.