LIVE UPDATES

इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला तात्पुरता ब्रेक | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक

इच्छुकांचे 'खातं' उघडण्यापूर्वीच निवडणूक 'होल्ड'वर
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 01, 2026 04:29 PM
views 60  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला होता. विविध मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेकांनी मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली होती. काही इच्छुकांनी तर दिवाळीच्या आधीच मतदारांना शुभेच्छा पत्रे पाठवून संपर्काचा 'शुभारंभ' केला होता. मात्र, निवडणूक लांबल्याने  इच्छुकांचा काहीसा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक जवळ आल्याची चर्चा सुरु होताच इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीत मतदारसंघनिहाय समीकरणे, संस्थांचे नेटवर्क आणि वैयक्तिक संपर्क यांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे निवडणूक जवळ येत असल्याचे संकेत मिळताच इच्छुकांनी आपापल्या पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद आणि संभाव्य इच्छुक आणि कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली होती. दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना पाठविण्यात आलेल्या शुभेच्छा पत्रांमधूनही अनेक इच्छुकांनी आपली राजकीय-सामाजिक ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

काहींच्या शुभेच्छा पत्रांवरून आगामी निवडणुकीची चाहूल स्पष्टपणे जाणवत होती. थेट निवडणुकीचा उल्लेख टाळत मतदारांशी संपर्क कायम ठेवण्याची रणनीती काही इच्छुकांनी स्वीकारली होती. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छांच्या माध्यमातूनही सहकार क्षेत्रातील संभाव्य उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात ‘संपर्क अभियान’ सुरू केल्याची चर्चा रंगली.

मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम लांबल्याने या सर्व हालचालींना काहीसा ब्रेक लागला आहे. निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कोण रिंगणात उतरणार आणि कोणत्या पॅनेलची बांधणी होणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. निवडणूक लांबल्याने काही इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी दुसरीकडे या कालावधीचा उपयोग संघटन मजबूत करण्यासाठी करण्याची संधीही अनेकांना मिळत आहे.

दरम्यान, निवडणूक लांबली असली तरी सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते मात्र थांबलेली नाहीत. पडद्यामागील बैठका, संभाव्य उमेदवारांच्या चाचपण्या, मतदारसंघनिहाय संपर्क आणि पॅनेलच्या संभाव्य रचनेवर चर्चा सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या हालचालींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळस इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले असून, दिवाळीच्या शुभेच्छांपासून सुरू झालेला संपर्काचा सिलसिला पुढे कोणत्या राजकीय समीकरणात रूपांतरित होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.