LIVE UPDATES

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात

अभिनेता अंकुश चौधरी, दीपा परब यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 01, 2026 05:46 PM
views 29  views

सिंधुदुर्ग : गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन साक्षी पोटे, योगिता निजामकर, प्रीती पांगे, सुरज कदम, नयना राणे, साक्षी तुटला आणि सुनीता मर्चंडे यांनी केले. या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. 'आपण कोण ? आपण कोकणकर !' असे आत्मीयतेने म्हणत त्यांनी संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. 'मी देखील तुमच्यातलाच एक आहे,' असे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दीपा परब यांनीही यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली १८ वर्षे सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाने विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन २०१२ साली झाले असले, तरी संस्थेच्या सामाजिक कार्याचा प्रवास त्याआधीपासून सुरू आहे. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, महिला सक्षमीकरणापासून अनाथ आणि गरजू मुलांच्या संगोपनापर्यंत संस्थेने आपल्या कार्याचा व्यापक विस्तार केला आहे. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून १,२०० मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या जीवनाला आधार देण्याचे काम निरंतर सुरू आहे. ५,००० हून अधिक स्कूल किटचे वाटप, दरवर्षी करून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपक्रम, अनाथ, निराधार आणि वंचित मुलांच्या शिक्षण, संगोपन व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, आरोग्यविषयक उपक्रम आणि आरोग्यसेवा,महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम, समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने मदतीचा हात दिला जातो.

संस्थेचे प्रत्येक उपक्रम केवळ मदतीपुरते मर्यादित नसून, गरजू व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी आणि आत्मनिर्भर भविष्य देण्याच्या उद्देशाने राबवले जातात. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेचे दयानंद कुबल यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीचा महत्त्वाकांक्षी संकल्प व्यक्त केला. २०३० पर्यंत तब्बल ३० लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय संस्थेने निश्चित केले आहे.आपण जे स्वप्न पाहिले आहे, ते केवळ स्वप्न राहणार नाही. योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची साथ, समाजाचा विश्वास आणि सेवाभावाच्या बळावर कोकण संस्था २०३० पर्यंत ३० लाख लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचेल," असा विश्वाससंस्थापक दयानंद कुबल यांनी व्यक्त केला. 

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा हा वर्धापनदिन म्हणजे केवळ एका संस्थेच्या स्थापनेचा उत्सव नसून, समाजासाठी झटणाऱ्या शेकडो हातांचा, हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष रंगत आली. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर संधी निर्माण करता येते आणि एकत्रित प्रयत्नांतून परिवर्तन घडवता येते,' हा संदेश देत संस्थेने आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर सामाजिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


ताजी बातमी

View all

आदित्य हळदणकर मित्रमंडळ - नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक
November 01, 2026
देवगड इथं 'मुक्तसंवाद'च्या आठव्या पुष्पात सायबर सुरक्षेवर जनजागृती
November 01, 2026
‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाला मिठबावमधून गती
November 01, 2026
वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार : नारायण राणे
November 01, 2026
संबंधित बातम्या

View all

आदित्य हळदणकर मित्रमंडळ - नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक
November 01, 2026
देवगड इथं 'मुक्तसंवाद'च्या आठव्या पुष्पात सायबर सुरक्षेवर जनजागृती
November 01, 2026
‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाला मिठबावमधून गती
November 01, 2026
वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार : नारायण राणे
November 01, 2026