LIVE UPDATES

सावंतवाडीत अवैध जुगारावर पोलिसांचा छापा

११ जणांवर गुन्हा दाखल ; वाहनांसह लाखांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 10, 2026 10:21 AM
views 259  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : तालुक्यातील दांडेली धनगरवाडी येथे सुरू असलेल्या एका बेकायदेशीर रमी जुगार क्लबवर सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी जुगार क्लब चालवणाऱ्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट, जुगाराचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास दांडेली धनगरवाडी येथील बंदिस्त घरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर याने आपल्या मालकीच्या घरात आरोपी राजकुमार दिनकर कवठणकर याला अवैध जुगार क्लब चालवण्यास परवानगी दिली होती. या क्लबमध्ये आरोपी हे रमी या पत्याच्या खेळावर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असताना पोलिसांना रंगेहात आढळून आले.

या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सातार्डा पोलीस दूर क्षेत्रातील पोलीस शिपाई राहुल बंडोपंत बर्गे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

दांडेली धनगरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. यात श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर (वय ४५, रा. दांडेली, सावंतवाडी), राजकुमार दिनकर कवठणकर (रा. कवठणी, सावंतवाडी), गणेश शांताराम सोपटे (वय ४८, रा. किनळे, वरचीवाडी, सावंतवाडी), सुधीर सोमनाथ राऊळ (वय ४१, रा. तेंडोली, कुडाळ),नंदकिशोर मनोहर नाईक (वय ५७, रा. किनळे, भटवाडी, सावंतवाडी), अनंत भास्कर सारंग (वय ६०, रा. सालईवाडा, सावंतवाडी),निरंजन आनंद नाईक (वय ३२, रा. आरोस, गिरोबावाडी, सावंतवाडी), आनंद सोहन केरकर (वय ५९, रा. मळेवाडा, परबवाडी, सावंतवाडी), गजानन महादेव वाडकर (वय ५८, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी),श्रीधर प्रकाश पालव (वय ३४, रा. तळवने, पालवाडी, सावंतवाडी), मिलन शांताराम खवणेकर (वय ४४, रा. शिरोडा, वरचीकेरवाडी, वेंगुर्ला) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

छाप्यादरम्यान पोलिसांनी जुगाराच्या टेबलवर मिळालेली रोख रक्कम व प्लास्टिक कॉईन्स, आरोपींच्या अंग झडतीत मिळालेले मोबाईल हॅन्डसेट्स आणि रोख रक्कम, २६ प्लास्टिक खुर्च्या, २ रमी टेबल, १ व्हॉल्टास वॉटर प्युरीफायर, १ लॉयड एसी (स्टॅबिलायझरसह), पत्यांचे नवीन व जुने बॉक्स, हिशोबाचे रजिस्टर आणि ७ दुचाकी वाहने (पल्सर, स्प्लिंडर, ॲक्टिव्हा, ज्युपिटर, स्टार सिटी) असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई प्र. पोलीस उपअधीक्षक श्री. शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याची नोंद महिला पोलीस हवालदार कदम यांनी केली असून, पुढील तपास सातार्डा पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टाकेकर करत आहेत.