
रत्नागिरी : कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी येथील तरुणांना न्याय देण्यासाठी कोकणासाठी विशेष कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात यावी तसेच कोकण विभागासाठी स्वतंत्र भरती सेवा मंडळ स्थापन करावे, असा ठराव भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीमध्ये विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
स्वयंवर मंगल कार्यालयात आज दुपारी झालेल्या बैठकीत आमदार जठार यांनी हा ठराव मांडला. रत्नागिरी जिल्ह्यात १० टक्के स्थानिक सरकारी नोकरदार आहेत. प्रत्येक गावात १० या हिशोबाने सुमारे २५ हजार व अन्य शासकीय खात्यांत २५ हजार कर्मचारी असे पन्नास हजार कार्यरत आहेत. गावागावांतील शाळांमध्ये आता शिक्षकांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे या सर्व कोकणवासियांच्या समस्या सोडवण्याकरिता व विकासाचा अनुशेष भरण्यासाठी विशेष कॅबिनेट बैठक घ्यावी, अशी मागणी जठार यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकण विभागीय स्तरावरील मंडळ पुनरूज्जीवित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली तसेच कोकणातील उद्योग, स्थानिक रोजगाराचे प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी 'विशेष कॅबिनेट बैठक' (मंत्रिमंडळ बैठक) कोकणात घेण्यात यावी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणासाठी विशेष बैठक आयोजित करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी या बैठकीत मांडली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, प्रदेश महामंत्री व आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार योगेश सागर यांनी केंद्रातील सत्तेचा उपयोग स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, यावर मार्गदर्शन केले.












