LIVE UPDATES

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सिद्धेश रावराणे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 12:14 PM
views 23  views

वैभववाडी : पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनंतर शासनाने ही नियुक्ती मंजूर केली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी अधिकृत पत्र जारी केले असून, शासनाच्या आदेशानुसार समितीवर रावराणे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 राज्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा, विविध शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, आरोग्य सुविधा बळकटीकरण तसेच लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही समिती कार्य करणार आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीवर वैभववाडी तालुक्यातून सदस्य म्हणून श्री रावराणे यांची निवड झाली आहे . याबद्दल श्री रावराणे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडीनंतर बोलताना श्री रावराणे म्हणाले,या समिती सदस्य पदी निवड केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानतो.या सदस्य पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रभावीपणे काम करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.