LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधींचे ठराव १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सादर करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 16:55 PM
views 191  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये आदिनाथ दगडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी संस्था सभासदांचे ठराव मागणेचा कार्यक्रम जाहीर केला असून तशी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.

जाहिर केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे, उक्त जिल्हा बँकेच्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सभासद असलेल्या सहकारी संस्था व इतर संस्था सभासदांनी आपले प्रतिनिधीचे ठराव १ सप्टेंबर २०२६ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक / सहकारी अधिकारी श्रे. १, सहकारी संस्था यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. याबाबत काही शंका असल्यास अजय हिरलेकर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) सिंधुदुर्ग यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे एकूण पात्र सभासद संस्थांना डाक नोंद पत्राने कळविण्यात आले असून ठरावाचा नमुना सुद्धा सोबत ४ प्रतीत पाठविण्यात आलेला आहे. तरी सर्व संबंधित संस्थांनी विहित कालावधीत ठराव व आवश्यक कागदपत्रे ४ प्रतीत संबंधित सहाय्यक निबंधक / सहकारी अधिकारी श्रे. १ यांचे कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग प्रदीप मालगावे यांनी केले आहे. तसेच सदर बाबतची अधिक माहिती १.०९.२०२६ रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.