LIVE UPDATES

कुणकेश्वरात तिसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांचा 'महासागर'

पहाटे मानाची पूजा, शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था : चौथ्या श्रावण सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन अध्यक्ष एकनाथ तेली यांची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 17:20 PM
views 38  views

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटे ५ वाजता पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवस्थान ट्रस्टचे सल्लागार प्रवीण कदम, शासकीय ठेकेदार ए. पी. सावंत आणि पुणे येथील उद्योजक राहुल शेवाळे यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची मानाची पूजा करण्यात आली. सकाळी ६ नंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या दोन्ही बाजूंनी दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी असूनही भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता आले.

पहिल्या श्रावण सोमवारपासूनच कुणकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तिसऱ्या सोमवारीही पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. दिवसभर विविध मान्यवरांसह भजनी मंडळांना भजनसेवेची संधी देण्यात आली.

माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली तहसीलदार, मालवण तहसीलदार, महाराष्ट्र मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण, राजापूर पत्रकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते तसेच मुंबईतील नामांकित भजनी बुवांच्या भजनांसह स्थानिक मंडळांनीही भक्तिमय वातावरण निर्माण केले. कुणकेश्वर श्रावण सोमवारी निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांच्या श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रत्येक भजनी मंडळाला एक-एक तासाचा वेळ देण्यात आल्याने सर्वांना आपली भजनसेवा सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे भजनी बुवा आणि स्थानिक मंडळांनीही उत्स्फूर्तपणे सेवा बजावली.

‘शंभू महादेवाच्या या ऊर्जा स्थानाकडे भाविकांची वाढती ओढ’

कुणकेश्वर हे शंभू महादेवाचे जागृत आणि ऊर्जा स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. आजपर्यंत कुणकेश्वराला साकडे घातलेल्या अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याच्या श्रद्धेमुळे दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारीही हीच मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, तिसऱ्या सोमवारी सायंकाळी देवस्थानचा वार्षिक ‘भावई’ कार्यक्रम दोन तास आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार असून, याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

७ सप्टेंबरला चौथा श्रावण सोमवार; रक्तदान शिबिराचे आयोजन

७ सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार असून या दिवशीही कुणकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. यानिमित्त कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासोबत या सामाजिक उपक्रमातही सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले.

तसेच श्रावण सोमवारच्या निमित्ताने सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणा,आरोग्य यंत्रणा,एसटी व पोलीस यंत्रणा कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सर्व पदाधिकारी सर्व कुणकेश्वर ग्रामस्थ, यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार व्यक्त केले.