
सावंतवाडी : मळगाव येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे, पाणी संवर्धनाला चालना देणे आणि भूजल पुनर्भरणाची कामे गतिमान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मात्र, एका बाजूला शासनाकडून भूजल पुनर्भरणासाठी प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली परिसरात मोठ्या प्रमाणात दगडखाण उत्खनन व ब्लास्टिंग सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांनी केला आहे.
गवंडे यांनी म्हटले आहे की, सोनुर्ली परिसरातील काही दगडखाणींमध्ये मोठ्या खोलीपर्यंत उत्खनन करून ब्लास्टिंग केले जात असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ब्लास्टिंगचे हादरे निगुडे, शेर्ले आणि मडुरा परिसरापर्यंत जाणवत असल्याचे नागरिक सांगतात. ब्लास्टिंगमुळे शेती, घरांची सुरक्षितता, नैसर्गिक जलप्रवाह आणि भूजल पुनर्भरण क्षेत्रांवर परिणाम होत आहे का, याची शास्त्रीय तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
“सोनुर्ली परिसरात नियमितपणे दुपारच्या सुमारास ब्लास्टिंग होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या ब्लास्टिंगमुळे भातशेतीचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिसरालगत सरकारी वनक्षेत्र असून तेथे वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यामुळे ब्लास्टिंगचा वन्यजीव व शेतीवर परिणाम होत आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी गवंडे यांनी केली.
ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक घेतले असताना वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. खाणकामामुळे निर्माण होणारा आवाज, कंपन व परिसरातील मानवी हालचाली यांचा वन्यजीवांवर काही परिणाम होतो का, याची वन विभागामार्फत पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली.
मे. दिलीप बिल्डकॉन कंपनीचे काम बंद झाल्यानंतर संबंधित ठिकाणी अन्य कंपनीला लीज/परवानगी देण्यात आली असल्यास त्याची संपूर्ण कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणीही गवंडे यांनी केली. संबंधित क्रशर खाणींना दिलेल्या लीज, उत्खनन परवानगी, पर्यावरणीय मंजुरी, ब्लास्टिंग परवानगी, प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण आणि शासनाला भरलेली रॉयल्टी यांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
“ज्या पद्धतीने शासन भूजल पुनर्भरणासाठी ‘जलतारा’सारखे उपक्रम राबवत आहे, त्याच वेळी खाणकामामुळे भूजलसाठे, नैसर्गिक जलप्रवाह आणि भूगर्भावर परिणाम होत नाही ना, हे तपासणेही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात निगुडे, सोनुर्ली, शेर्ले, मडुरा व परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाल्यास त्याची कारणमीमांसा आजच करणे आवश्यक आहे,” असे गवंडे यांनी म्हटले आहे.
या परिसरात यापूर्वी भूकंपाची घटना घडली असून त्याचा केंद्रबिंदू इन्सुली परिसरात असल्याचा संदर्भ देत, मोठ्या प्रमाणातील ब्लास्टिंगचा स्थानिक भूगर्भीय स्थैर्यावर काही परिणाम होतो का, याबाबत भूगर्भशास्त्रज्ञांकडून स्वतंत्र अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, दगडखाणींना देण्यात आलेल्या परवानग्या व प्रत्यक्ष उत्खनन यामध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, ब्लास्टिंग निर्धारित नियमांनुसार होत आहे का, तसेच यामुळे जलस्रोत, शेती व वनक्षेत्रावर परिणाम होत आहे का, याची महसूल, खनिकर्म, भूजल सर्वेक्षण व वन विभागाच्या संयुक्त पथकाने तपासणी करावी, अशी मागणी गवंडे यांनी केली आहे.
“भूजल वाचविण्यासाठी ‘जलतारा’ उभारला जात आहे; मग त्याच परिसरातील भूगर्भाच्या सुरक्षिततेबाबत शासन गंभीरपणे पावले उचलणार का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांनी उपस्थित केला आहे.










