LIVE UPDATES

पालकमंत्री राणेंकडून भातशेती, बंधारा - विहिरींच्या पाणीपातळीची प्रत्यक्ष पाहणी

कोकणातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती | आठही तालुक्यांतील परिस्थितीचा घेतला जाणार आढावा
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 13:22 PM
views 19  views

वेंगुर्ला : संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलस्रोत, भातशेती तसेच पाण्याची उपलब्धता याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात पाहणी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे भातशेती, नदीवरील बंधारा तसेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची उपलब्धता किती आहे, विहिरी व अन्य जलस्रोतांची स्थिती कशी आहे, तसेच गावपातळीवर छोटे बंधारे उभारून पाणी अडविण्याच्या शक्यता काय आहेत, याचा या पाहणी दौऱ्यात आढावा घेतला जात आहे.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी भातशेतीची पाहणी करून शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. तसेच नदीवरील बंधाऱ्याची पाहणी करून पाण्याची उपलब्धता आणि पाणी साठवणुकीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विहिरींमधील पाण्याची पातळीही तपासण्यात आली.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून जमिनीवरील परिस्थिती जाणून घेणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.”

“विहिरींची परिस्थिती काय आहे, पाण्याची पातळी किती आहे, तसेच ग्रामपंचायतीच्या पातळीवर काही छोटे बंधारे उभारून पाणी अडविता येईल का, याचाही विचार केला जात आहे. त्याचबरोबर याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे,” असे राणे यांनी सांगितले.

प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यावर भर

संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. “मदत सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितच देतील. मात्र, ती मदत किती असावी, कोणत्या भागाला कोणत्या स्वरूपाची गरज आहे, याची माहिती शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठीच हा पाहणी दौरा आयोजित केला आहे,” असे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शेती, जलस्रोत, विहिरी आणि बंधाऱ्यांची सद्यस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास येणार असून, आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा कृषी अधिकारी भाग्याश्री नाईकनवरे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, तहसीलदार ओंकार ओतारी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी शिवभोरे, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर, पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्लकुमार शिंदे, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, तुळस सरपंच रश्मी परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, पाल सरपंच रसिका केळुसकर, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, मातोंड उपसरपंच वैभवी परब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, सखाराम सावंत, मंडळ अधिकारी प्रेरणा गिरप, तलाठी नेत्रा सावंत, माजी सभापती यशवंत परब, तुळस देवस्थान मानकरी अनिल परब, रवी केळुसकर, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख सुभाष सावंत, नितीन चव्हाण, नितीन परब, तुषार साळगावकर, यांच्यासहित लघु पाटबंधारे, जलसंधारण, महसूल विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.