LIVE UPDATES

मळगाव येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते भूजल पुनर्भरणासाठीच्या कामाला सुरुवात
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 27, 2026 13:42 PM
views 29  views

सावंतवाडी : मळगाव येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात पाणी संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरविणे आणि त्यातून भूजल पातळी वाढविणे, हा ‘जलतारा’ उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. भविष्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.

‘जलतारा’ हा उपक्रम केवळ फोटो काढण्यापुरता न ठेवता त्याची प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. महाराष्ट्रात आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती या उपक्रमामुळे दूर होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात पाणी संवर्धन, भूजल पुनर्भरण तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मळगाव येथे ‘जलतारा’ खड्ड्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.