
सावंतवाडी : बांदा ते संकेश्वर महामार्गावरील आंबोली फॉरेस्ट नाका येथे आंबोली पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली. बेकायदेशीर आणि विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी टाटा सुमो गाडी पकडण्यात आली असून, वाहनासह एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, रा. वरवंड गणेश वाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २१ जून २०२६ रोजी रात्री १:१० वाजण्याच्या सुमारास बांदा ते संकेश्वर महामार्गावर आंबोली फॉरेस्ट नाक्याजवळ संशयास्पद टाटा सुमो गोल्ड गाडी (क्र. MH-42-K-0269) थांबवून तिची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत गाडीमध्ये 'इम्पिरियल ब्लू' कंपनीचे लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे एकूण १२ पुठ्ठयाचे बॉक्स आढळून आले. यात १८० मिली मापाच्या एकूण ५७६ काचेच्या सीलबंद बाटल्या होत्या. या कारवाईत पोलिसांनी ९५ रुपये किमतीच्या एकूण ४८,९६० रुपयांच्या दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी, असा एकूण ३,४८,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कारवाई सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रामदास जाधव, मनिष शिंदे, पोलीस नाईक गौरव गोविंद परब आणि होमगार्ड आनंद बरागडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस नाईक गौरव परब यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे करत आहेत.










