
देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे आदर्श विद्यामंदिर प्रशालेच्या ४६ वा वर्धापन दिन सोहळ्या निमित्त १९९१-९२ च्यामाजी विद्यार्थ्यांकडून शाळेस वॉटर कुलर भेट देण्यात आला. किंजवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर किंजवडे शाळेचा ४६ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सन २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ तसेच सन १९९१-९२ च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला वॉटर कुलर भेट सुपूर्द करण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात शाळेच्या अपना बँक सभागृह येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व चंद्रकांत के.कामतेकर यांच्या अध्यक्ष निवडीने झाली. त्यानंतर सरस्वतीमातेच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.शाळेच्या प्रगतीचा आढावा, शैक्षणिक वाटचाल,विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश आणि आगामी उपक्रमांची माहिती प्रशाला मुख्याध्यापक सं. बा. राठोड यांनी प्रास्ताविकातून दिली.विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून शाळेविषयीची आत्मीयता व्यक्त करत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजाप्रती जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुण्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांचे महत्त्व अधोरेखित केले.तसेच विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.
यावेळी सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षांमध्ये इ.५ ते १० मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे पालक, शिक्षक व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सन १९९१-९२ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वॉटर कुलर भेट दिला.या उपक्रमाबद्दल संस्था, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानले.माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही शाळेच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावावा तसेच माजी विद्यार्थ्यांनीही शाळेच्या यशात आपला असाच सहभाग ठेवावा निरंतर सहकार्य असावे असे सांगितले.संस्थेच्या प्रगतीत शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचे योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे आभार पां.सं. काळे यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










