
सावंतवाडी : बांदा परिसरातील एका गावातील माध्यमिक शाळेत शुक्रवारी गंभीर प्रकार घडला. एका १९ वर्षीय युवतीला पळवून नेल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने थेट शाळेत घुसून एका ५५ वर्षीय शिक्षकाला मारहाण केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण शाळा परिसरात आणि गावात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे
या गावातील १९ वर्षीय एक मुलगी काही दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. संबंधित शिक्षकानेच तिला पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त ग्रामस्थांचा एक मोठा जमाव गोळा होऊन थेट शाळेत पोहोचला. या जमावाने संबंधित शिक्षकाला वर्गाच्या बाहेर बोलावले व विचारणा करुन चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सोडवत पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणी आणि संबंधित शिक्षक या दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान मी आई-वडिलांकडे जाणार नसून,व शिक्षकासोबतच जाणार आहे, असा स्पष्ट निर्णय संबंधित तरुणीने पोलिसांसमोर घेतला. तिने या संदर्भातील आपला लेखी जबाबही पोलिसात लिहून दिला आहे. तरुणी ही कायद्यानुसार सज्ञान असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे उपस्थित ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. हा शिक्षक जर पुन्हा शाळेत दिसला तर त्याला चांगलाच धडा शिकवू असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात घेतला. यावर पोलिसांनी ग्रामस्थांना कडक शब्दांत सुनावले. संबंधित मुलगी ही सज्ञान असून तिने स्वतःचा निर्णय स्वतः घेतला आहे. कायद्यानुसार ती तिच्या इच्छेने जाण्यास मुक्त आहे. असे असतानाही जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, किंवा शिक्षकावर पुन्हा हल्ला केला, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी ग्रामस्थांना दिला आहे.










