
कणकवली : येथील एस. एम. हायस्कूलच्या जुन्या व जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळेच्या इमारतींची पाहणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे माजी विद्यार्थी संदीप चंद्रकांत मेस्री यांनी केली आहे. तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कणकवलीतील एस. एम. हायस्कूल ही अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून या इमारतीत आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व कर्मचारी ये-जा करतात. मात्र इमारतीची सद्यस्थिती पाहता ती जीर्ण झाली असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः किंवा संबंधित अधिकाऱ्यांमार्फत एस. एम. हायस्कूलच्या इमारतीची पाहणी (Inspection) करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी संदीप मेस्री यांनी केली आहे.
"शाळेतील मुलांच्या जीविताचा प्रश्न असल्याने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलावीत," असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.










