LIVE UPDATES

सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार !

टीकेकडे दुर्लक्ष करा, कामावर लक्ष देत आपली रेघ वाढवा | पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 14, 2026 19:21 PM
views 42  views

सावंतवाडी : कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने कोकण विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. येथील विकासासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसामुळे केवळ ७ महिने आपल्या हातात मिळतात. यामुळे काहीवेळा निधी अखर्चित राहतो. म्हणूनच, कामे लवकर कशी पूर्ण होतील व ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थानकालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सावंतवाडीकरांना दिलेला शहराच्या विकासाचा शब्द आम्ही पूर्ण करत असून विरोधकांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, विकासावर भर द्या, आपली 'रेघ' मोठी करून कामे पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानंतर पालिकेच्या  बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेतील २७ सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मंत्री राणे म्हणाले, नगरपरिषद निवडणूकीत खासदार नारायण राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शहराचा जुना विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे. यामध्ये माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांचे योगदान मोठे आहे. सध्या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची प्रचंड तळमळ असणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक लाभले आहेत. त्यामुळे शहरासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विकास करायचा आहे. आता नगराध्यक्षा या राजघराण्यातील असल्याने आपल्याला केसेसची कसलीही चिंता राहिलेली नाही. युवराजांचा होकार मिळेलच असही त्यांनी सांगितले.

तर गुजरात मधील 'वनतारा' प्रकल्प आणि तेथील विकास पाहून एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. केवळ गुजरातचे कौतुक करत न बसता आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावात असा जागतिक दर्जाचा प्रकल्प कसा उभारता येईल ? यासाठी आमचा प्रयत्न आहे. जगातील लोकांना आपल्या सावंतवाडीचा हेवा वाटेल असे काम करून मतदारांनी दिलेल्या विश्वासाला व मताला आम्ही पूर्ण न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिल. तर विकासकामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा निधीचे दरवाजे बंद होतील असा इशारा मुख्याधिकारी यांना दिला. तर मतदारांच्या आशीर्वादामुळे सावंतवाडीला आदर्श शहर बनवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. 'सिंधुरत्न' योजनेसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामे वेळेत पूर्ण करा आणि पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच योगा सेंटर शहरात होत असल्याने शिवसेना व भाजपच्या लोकांना तिथे पाठवा. योगामुळे डोकं आणि मन स्वच्छ होऊन जाईल अशा शब्दांत कानही टोचले.

दरम्यान, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेतही मोठी सुधारणा होणार आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल माजी मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे आभार मानले. तर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे तसेच अनेक विकासकामांचा शुभारंभहोत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, लखमराजे भोंसले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, न.प. सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी विनायक औंधकर तर सूत्रसंचालन ॲड. प्रणीता कोटकर हीने केले.