LIVE UPDATES

CCTV चा प्लॅन पोलिस अधिक्षकांकडून राज्यशासनाकडे : नितेश राणे

Edited by: विनायाक गांवस
Published on: June 14, 2026 19:38 PM
views 39  views

सावंतवाडी : सीसीटीव्हीचा प्लॅन पोलिस अधिक्षकांकडून राज्यशासनाकडे गेला आहे‌. पूर्ण राज्याचे एकच कंट्रोल सेंटर असावं अशी भुमीका मुख्यमंत्र्यांची आहे. याचा निर्णय लवकरच होणार असून सिंधुदुर्गला पहिलं प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या निगारणीखाली येईल, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित लाड-पागे समितीची नियुक्तीपत्र आज देण्यात आली असून याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना आहे‌. देवेंद्र फडणवीस राज्याचे खऱ्या अर्थाने 'कुटुंबप्रमुख' म्हणून भूमिका बजावत आहेत असेही त्यांनी म्हटले. 

मंत्री श्री‌. राणे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात वेगळं सीसीटीव्ही सेंटर असल्याने पोलिसांना काही केसेस सोडवताना अडचण होऊ शकते‌. मुख्यमंत्र्यांच्या याबाबत दोन बैठका झाल्या असून लवकरच हा निर्णय होणार आहे. त्यानंतर पहिल्या दहामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पहिल प्राधान्य सिंधुदुर्गला दिलं जाईल, त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या अंतर्गत कव्हर झालेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीतील मोती तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्पाचे सादरीकरण मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत झालं आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी मोती तलावाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण प्लॅन्सचे सादरीकरण केले होते. प्लॅन अंतिम झाल्यावर टप्प्याटप्प्याने आवश्यक तो निधी दिला जाईल अशी ग्वाही दिली. नगराध्यक्षा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही संकल्पना असून, सावंतवाडी नगरपरिषद आणि राजघराणे एकत्र येऊन हा पुढाकार घेत आहेत. मोती तलावाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लुक देण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. येत्या काळात याचे बदलते चित्र निश्चित दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच योगाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. २१ जून रोजी येत असलेल्या 'इंटरनॅशनल योगा डे' च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले अधिकृत योगा सेंटर सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सावंतवाडीत साकारत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. संबंधित कंत्राटदारांना हा प्रकल्प एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, नगराध्यक्षावर झालेल्या आरोपांवर त्यांना विचारले असता, तो पूर्णपणे पक्षांतर्गत विषय आहे. आरोप करणारे सर्वजण मूळ भारतीय जनता पक्षाच्याच विचारांचे आहेत. घरातील भांडण घरात सोडवू, या विषयावर पक्षाच्या व्यासपीठावर सविस्तर चर्चा केली जाईल. प्रदेशाध्यक्ष, मी स्वतः आणि खासदार नारायण राणे या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. कोणाचे काही किंतु-परंतु असतील किंवा भावना दुखावल्या असतील, तर आमच्या घरातील भांडण आम्ही घरातच सोडू. पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, त्यामुळे आता हा विषय संपला आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच सांस्कृतिक दहशतवाद हा शब्द फक्त जैन किंवा हिंदू समाजाच्या बाबतीतच का वापरला जातो ? गेल्या महिन्यात बकरी ईदचा सण झाला, तेव्हा रस्त्यावर येणारे सिलेंडर त्यांना दिसत नाहीत. रस्त्यावर होणाऱ्या नमाजला कोणीच आक्षेप का घेतला नाही ? मनसे आणि उबाठा च्या लोकांची प्रतिक्रिया मी ऐकली. या लोकांनी कधी बेहरामपाडा, नळबाजार किंवा मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही पाहिलेले नाही. हिंमत असेल तर बेहरामपाडा आणि मोहम्मद अली रोडवरील हिरवे पट्टे काढून दाखवा असाही इशारा त्यांनी दिला.  भोंग्यांच्या आंदोलनात भोंगे बंद करण्याचे काम कोणाच्या आंदोलनामुळे झालेले नाही, तर महायुतीचे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही ते बंद करून दाखवले. फक्त हिंदूंच्या विरोधात वारंवार आवाज उठवला जात असेल, तर सरकार म्हणून त्याची नोंद घ्यावीच लागेल. उद्धव ठाकरेंसमोर मोजून केवळ तीनच खासदार उपस्थित होते. बाकीचे ऑनलाईनच्या नावाखाली 'आऊट ऑफ नेटवर्क' होते. आता त्यांच्यावर 'हम दो हमारे दो' ची वेळ आली आहे. येत्या काळात त्यांचा उबाठा पक्ष शिल्लक राहील असे वाटत नाही. आम्हाला आता 'ऑपरेशन टायगर' किंवा 'ऑपरेशन लोटस' करण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्याच लोकप्रतिनिधींना त्यांच्यासोबत राहायचे नसेल आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित वाटत नसेल, तर त्यांना कोणीही बांधून ठेवू शकत नाही. प्रत्येकालाच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. या खासदारांच्या यादीत कदाचित संजय राऊतांचेही नाव असू शकते, असाही गौप्यस्फोट केला. 

तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने आधीच कर्जमाफी दिलेली आहे, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मग आता उपोषण कशासाठी ? तर, दरड किंवा दगड कोसळण्याचा घटना दरवर्षी पावसाळ्यात आंबोली घाट, आदी घाट या भागात घडत असतात. अशा घटना घडताच पीडब्ल्यूडी, जिल्हा प्रशासन आणि हायवेची टीम तात्काळ तिथे पोहोचते आणि रस्ता सुरू करते. तर, मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, यावर्षी 'एल निनो'चा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि शासनाकडून, कृषी विभागाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांनुसारच शेतीची कामे हाती घ्यावीत असे आवाहन राणेंनी केले.