
देवगड :आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनाबांधणीला वेग देण्यास सुरुवात केली असून, राज्य सरचिटणीस शिरीष सावंत आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली विधानसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक देवगड किल्ला गणेश मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटना विस्तार, पक्षबांधणी आणि निवडणूक तयारीबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
दि. १२ जून २०२६ रोजी झालेल्या या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक दिशा आणि धोरण निश्चित केले. यावेळी मार्गदर्शन करताना मनसेचे राज्य सरचिटणीस शिरीष सावंत यांनी पक्षवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध करून देत कार्यकर्त्यांना अधिक बळ दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रभावी नियोजन करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संघटना तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यांमध्ये स्वतंत्र मेळावे लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
बैठकीत संघटनात्मक विस्तार, नवीन सदस्य नोंदणी, स्थानिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका, आगामी निवडणुकांची रणनीती तसेच पक्षाची जनसंपर्क मोहीम अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनीही विविध विषयांवर आपली मते मांडत संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये, देवगड तालुका सचिव जगदीश जाधव, देवगड शहराध्यक्ष सचिन राणे, महिला तालुका उपाध्यक्ष स्वाती सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष पप्पू जाधव, शहराध्यक्ष अभिजित तेली यांच्यासह असंख्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










