LIVE UPDATES

हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

ओमकार हत्तीचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण : गुणाजी गावडे
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 08, 2026 18:02 PM
views 24  views

सावंतवाडी : माजगाव वनपरिक्षेत्रातील इन्सुली, वाफोली, वेत्ये आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून ओमकार हत्तीचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून फळबागा, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर मालमत्तेचीही हानी केली आहे.

सध्या भातशेती पेरणीचा हंगाम सुरू होत असताना हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना नियमांनुसार नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी अर्जुन गावडे यांनी माजगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. भातशेती पेरणीपूर्वी हत्तींचा बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे सरपंच गुणाजी गावडे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. आता वनविभाग या गंभीर प्रश्नाकडे किती तत्परतेने लक्ष देतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.