सावंतवाडीत २० जानेवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2026 11:22 AM
views 30  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार असून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व कोकण संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते  दयानंद कुबल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरासाठी भ. क. ल. वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांचे सहकार्य लाभले आहे.

या आरोग्य शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध असणार असून हृदयविकार (अँजिओप्लास्टी, बायपास), युरोलॉजी (मूत्रपिंड व प्रोस्टेट विकार), अस्थिरोग (अपघात व सांधेदुखी), कॅन्सर शस्त्रक्रिया, डोळ्यांचे विकार (मोतीबिंदू व कॉर्निया), स्त्रीरोग, कान-नाक-घसा तसेच जनरल सर्जरी अशा विविध विभागांतील आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी या शिबिरातच केली जाणार आहे.

मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया सुरक्षित, प्रभावी व आधुनिक पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून वेळेत उपचार घेतल्यास रुग्णांचे दैनंदिन जीवनमान सुधारते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपचार मोफत असून त्यासाठी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड तसेच आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. शिबिरस्थळी रुग्णांसाठी नाश्ता, चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी पत्रकातील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा. याच धर्तीवर दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी तुळस येथेही असेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून वेताळ प्रतिष्ठान तुळस व कोकण संस्था यांच्या माध्यमातून हे शिबिर होणार आहे.