
कुडाळ (प्रतिनिधी)
अयोध्या येथील सकल हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या व्यवहारात आणि रामभक्तांनी दिलेल्या देणग्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करत आज कुडाळमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने रविवार, दि. ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ शहर येथील श्री देव मारुती मंदिर येथे 'महाआरती' करून सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.या आंदोलनामुळे कुडाळ शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.या आंदोलनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनावर घणाघाती टीका केली. नाईक म्हणाले, "सन १९८९ सालापासून देशात राम मंदिरचे आंदोलन सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची श्रद्धा आणि भावना या मंदिराशी जोडलेली आहे. सर्वसामान्य जनतेने, गरिबांनी आपल्या हक्काचे हजारो कोटी रुपये अत्यंत पवित्र भावनेने राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिले. मात्र, या पैशांचा आणि जमिनीचा गैरव्यवहार करून लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे."पुढे बोलताना त्यांनी मुख्य संशयित चंपतराय यांच्यावर निशाणा साधला. "या गंभीर घोटाळ्यात थेट नाव येऊनही चंपतराय यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा हा जिवंत पुरावा आहे. म्हणूनच आज कुडाळमधील सर्वपक्षीय जनतेने एकत्र येत हे आंदोलन पुकारले असून, जोपर्यंत खऱ्या आरोपींना अटक होऊन कडक शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा नाईक यांनी दिला.या निषेध महाआरती आंदोलनाला कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार वैभव नाईक, तालुका प्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, संदेश पडते, विनायक शिरसाट, बाळा वेंगुर्लेकर, गुरुनाथ सडवेलकर, बाळा पावसकर, संजय बोभाटे, अमित राणे, सुमेध साळवी, बंड्या कोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री देव मारुती मंदिराच्या परिसरात सर्वांनी एकत्र येत आधी महाआरती केली आणि त्यानंतर निषेध सभा घेऊन आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.










