LIVE UPDATES

दोडामार्ग तालुका ३ दिवस अंधारात

विजेच्या लपंडावामुळे दोडामार्ग वासीयांचा संताप | प्रवीण गवस यांचा आंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 05, 2026 19:42 PM
views 46  views

दोडामार्ग : मुसळधार सुरु झालेल्या पावसानंतर दोडामार्ग तालुक्यातील वीज वितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अनेक गावे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात असून महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून मोबाईल नेटवर्क, उद्योग-व्यवसाय, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा याच पाश्वभूमीवर सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस सोमवार 6 जुलै रोजी थेट पावसात भिजत दोडामार्ग विजवितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होताच वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू होतो. जीर्ण विद्युत पोल वीजवाहिन्या, आणि क्षमतेबाहेर काम करणारे ट्रान्सफॉर्मर यामुळे किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एका बाजूला स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आधुनिकतेचा गाजावाजा केला जात असताना दुसऱ्या बाजूला मूलभूत वीज पायाभूत सुविधा मात्र दुर्लक्षित असल्याची टीका होत आहे.

पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे झाल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात प्रत्येक वर्षी त्याच समस्या निर्माण होत असल्याने या कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, स्थानिक अधिकारी व कर्मचारी मर्यादित मनुष्यबळ आणि अपुऱ्या साधनसामग्रीतून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाबही नागरिकांनी मान्य केली आहे. मात्र, हा प्रश्न कर्मचाऱ्यांचा नसून वर्षानुवर्षे मजबूत पायाभूत सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षाचा असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींनी केवळ पाहण्या, निवेदने आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता दोडामार्गसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून जीर्ण वीजवाहिन्यांचे नूतनीकरण, नवीन खांब, सक्षम ट्रान्सफॉर्मर आणि आपत्कालीन दुरुस्ती यंत्रणा उभारण्यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज ही चैनीची नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याशिवाय साटेली-भेडशी व संपूर्ण तालुक्यातील वायरमन व अधिकारी नागरिकांचे फोन उचलत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच येथील कंत्राटी कर्मचारी लक्ष्मण पेळपकर यांना पुन्हा सेवेत रुजू करून साटेली-भेडशी परिसरातच नियुक्ती द्यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.