'मी गृहिता २०२५' च्या मानकरी संध्या मुळीक तर पाककलेच्या विजेत्या निता ओटवणेकर

वेंगुर्लेतील गृहिता महिला औद्योगिक संस्थेचे आयोजन
Edited by:
Published on: March 13, 2025 16:37 PM
views 75  views

वेंगुर्ले : खेळ गृहिणींचा सन्मान.. गृहितांचा.. एक दिवस मनोरंजनाचा... २०२५ अंतर्गत गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे गृहिणींसाठी आयोजित केलेल्या मी गृहिता २०२५ च्या विजेत्या संध्या मुळीक तर पालकला स्पर्धेच्या विजेत्या निता ओटवणेकर ठरल्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गृहिता महिला औद्योगिक सह‌कारी संस्थेतर्फे गृहिणींसाठी भरपूर मनोरंजन असलेले मी गृहिता अंतर्गत विविध खेळ, तसेच सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच नाविन्यपूर्ण रिल्स स्पर्धा व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होती.  वेंगुर्ले भटवाडी येथील श्री देव विश्वेश्वर सांब सदाशिव देवस्थान मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मुक्तांगण संचालिका व समाजसेविका मंगलताई परुळेकर व नवोदित अभिनेत्री रुचिता शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा गौरी मराठे, डॉ. पूजा कर्पे, रील स्टार प्रियांका मसुरकर, सर्व गृहिता संचालक महिला उपस्थित होत्या.

पाककला स्पर्धेत प्रथम-नीता ओटवणेकर, व्दीतीय-श्रावणी पाटकर, तृतीय (विभागून)- वैष्णवी वायंगणकर व संजना राऊळ यांनी क्रमांक पटकाविले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. सायली प्रभू (कुडाळ), दीपलक्ष्मी पडते (कुडाळ), श्रेया कुमठेकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले. विजेत्याना रोख रक्कम तसेच सर्व सहभागीना स्पर्धकांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने दिव्यांग संस्थेसाठी काम करणाऱ्या रुपाली पाटील, जैविक कीटकनाशके व उद्यानविद्या या विषयात शिवछत्रपती वनश्री पुरस्कार विजेत्या प्राध्यापिका डॉ. धनश्री पाटील, मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत बेस्ट रॅम्प वॉक पुरस्कार मिळालेली किरण मेस्त्री, सिंधुदुर्गच्या सुकन्या आणि सिंधुदुर्ग व गोव्यातील सुप्रसिद्ध रिल्स स्टार प्रियांका मसुरकर / राजेश माळगावकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

मी गृहिता २०२५ या खेळाच्या मानकरी संध्या मुळीक ठरल्या त्यांना रिफ्रिजेटर तर द्वितीय क्रमांक अश्विनी राणे यांनी पटकाविला त्यांना बजाज कुलर व तृतीय क्रमांक सौ. कांबळी यांनी पटकाविला त्याना एलईडी टीव्ही देऊन गौरविण्यात आले. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरण करण्यात आली.अनोख्या सिंधुदुर्गातील पहिल्याच रिल्स स्पर्धेला महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या रिल्स स्पर्धेचा कालावधी कांही तांत्रिक कारणाने वाढविण्यात आल्याने त्याचा निकाल हा गृहिता संस्थेच्या पुढील कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेचा कालावधी ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे.

या नाविन्यपूर्ण स्पर्धेत तसेच महिलांसाठीच्या विविध खेळात जिल्हयातील गृहिणी व महिलांनी मोठ्या प्रमाणांत सहभागी घेतला होता. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गृहिता महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या पदाधिकारी, संचालक व सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले.