
कुडाळ : नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय गैरकारभार, मनमानी आणि नगरपंचायतच्या मालकीच्या जमिनीच्या संरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप करत प्रभाग १२, हिंदू कॉलनीच्या नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला आहे. या घडामोडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कुडाळ शहरातील एका मध्यवर्ती भागातील जमिनीबाबत मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा सभेत विषय चर्चेला न ठेवता परस्पर 'ना हरकत' दाखला दिला. या गंभीर प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या आणि मुख्याधिकाऱ्यांची चूक निदर्शनास आणून देणाऱ्या नगरसेविकेच्या विरोधात नगराध्यक्ष आणि काही सत्ताधारी नगरसेवकांनी भर सभेत प्रशासनाची बाजू घेतल्याचे संध्या तेरसे यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, ही जमीन वाचवण्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून एड. अमोल मालवणकर यांची तातडीने नेमणूक करण्यात आली होती आणि त्यांनी ३ जुलै रोजी पत्र देऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अपेक्षित ठराव तातडीने मागितला होता. मात्र, लगतच्या विशेष सभेत हा अत्यंत महत्त्वाचा विषय जाणीवपूर्वक टाळण्यात आला. इतकेच नव्हे तर, मुख्याधिकाऱ्यांनी १९ जून रोजी भेट घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच २२ जून रोजी संबंधित जागेचा खरेदी व्यवहार व रजिस्ट्री कशी झाली? आणि नगरपंचायत व दुय्यम निबंधक सिंधुदुर्ग यांच्यातील पत्रव्यवहार एका दिवसात कसा पूर्ण झाला? असे अनेक गंभीर प्रश्न तेरसे यांनी उपस्थित केले आहेत.
"ज्या सभागृहात नगरपंचायतीची बहुमूल्य जागा वाचवण्यासाठी ठराव मांडू दिला जात नाही, स्वतःची मनमानी करत नगरसेवकांचे अधिकार डावलले जातात, त्या सभागृहात बसणे म्हणजे सुरू असलेल्या मनमानी कारभाराला उघडपणे साथ देण्यासारखेच आहे." — संध्या प्रसाद तेरसे
मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर कारवाईच्या मागणीसाठी संध्या तेरसे यांनी २ जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने १० जुलै रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपोषणही करण्यात आले. कुडाळ शहरातील १०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवूनही मुख्याधिकाऱ्यांनी ७ दिवस उलटूनही अहवाल सादर केला नाही, यामुळे मुख्याधिकारी नेमके कोणाच्या छत्रछायेत एवढी मुजोरी दाखवत आहेत, असा संतप्त सवाल तेरसे यांनी उपस्थित केला आहे.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे म्हणजेच राणे कुटुंबियांशी घरोब्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध असताना देखील हे टोकाचे पाऊल का उचलले गेले?
निवडणुका तोंडावर असताना राजीनाम्याची घाई का?: अवघ्या चार महिन्यांत कुडाळ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा लागणार आहेत. असे असताना राजीनाम्याची नेमकी एवढी घाई का करण्यात आली?
या आक्रमक राजीनाम्यामुळे संध्या तेरसे यांना आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होणार की तोटा ठरणार, याविषयी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर्क-वितर्क लढवले जात असून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्याय मिळवण्यासाठी आणि सत्य समाजहिताच्या बाजूने कायदेशीर लढा देऊनही प्रशासनाकडून साधी दखलही घेतली जात नसल्याने अखेर आपण मनातील सर्व संताप व्यक्त करत पदाचा राजीनामा देत असल्याचे तेरसे यांनी स्पष्ट केले आहे.










