LIVE UPDATES

दोडामार्गात 'एक दिवस बळीराजासाठी' !

बांधावरच्या शाळेतून विद्यार्थ्यांना शेतीचा अनुभव
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 21, 2026 17:38 PM
views 26  views

दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे 'दप्तराशिवाय एक दिवस' या उपक्रमांतर्गत 'एक दिवस बळीराजासाठी – बांधावरची शाळा' हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शेतात उतरून भातलागवड, रोपे लावणे, पाणथळ शेतात काम करणे तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून घेतली.

विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून श्रमदान करत भाताची रोपे लावली. तसेच पॉवर टिलरच्या सहाय्याने जमीन तयार करण्याची प्रक्रिया, रोपांची लागवड आणि पावसाळी शेतीतील विविध कामे प्रत्यक्ष पाहून त्यांचे महत्त्व जाणून घेतले. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, अन्नधान्य निर्मितीमागील कष्ट आणि शेतकऱ्यांचे योगदान याची जाणीव झाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

"शेतीची ओळख – श्रमाची प्रतिष्ठा – अन्नाचा सन्मान" हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. शिक्षणासोबत जीवनमूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.