
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात उत्कृष्ट व लोकोपयोगी सेवा बजावणारे अन्न सुरक्षा अधिकारी अभय राजु चंदनशिवे यांचा 'कोकणसाद'च्या ३७ व्या वर्धापन दिनी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीमुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजू झाले, अभय राजु चंदनशिवे यांची ही पहिलीच पोस्टिंग असून त्यांनी अल्प कालावधीतच आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप पाडली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हे एक प्रमुख पर्यटन हब असल्यामुळे येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते आणि हॉटेल व्यवसाय जोरदार सुरू असतो. अशा परिस्थितीत पर्यटकांना आणि नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली आहे.
पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील विविध आस्थापनांची कसून तपासणी केली असून, अनेक अन्न नमुने (Food Samples) तपासणीसाठी घेतले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारतानाच, त्यांनी व्यापाऱ्यांमध्ये कायदेशीर जाणीव जागृती निर्माण केली.
व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन
केवळ कारवाई न करता त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला तसेच हॉटेल व्यावसायिकांना उत्तम मार्गदर्शन करून नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन (FoSTAC) उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान लाभले असून, व्यावसायिकांच्या विविध बैठका घेऊन त्यांना आरोग्याची उच्च मापदंडे पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.त्यांच्या याच लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल घेऊन 'कोकणसाद' च्या ३७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले. या सत्कारामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांवर पुन्हा एकदा कौतुकाची मोहोर उमटली आहे.










