LIVE UPDATES

बेकायदा जमाव करून मनाई आदेशाचा भंग

वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या सहित 18 जण निर्दोष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 21, 2026 18:07 PM
views 38  views

कणकवली : तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने एड.उमेश सावंत व एड. विरेश नाईक यांनी काम पाहिले. 27 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भारतीय जनता पक्षाच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांकडून भाजप व शिवसेना पक्ष यांचे पदाधिकारी यांना सीआरपीसी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशही लागू केले होते. असे असताना शिवसेना कार्यालय येथे बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासहित सतीश सावंत, संजय आग्रे, भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, हर्षद गावडे, शैलेश भोगले, राजू राठोड, सचिन सावंत, बबन शिंदे, मंदार केणी, प्रसाद चव्हाण, यतीन खोत, महेश कांदळगावकर, नामदेव कासवकर, संदेश पारकर, कन्हैया पारकर, अतुल रावराणे आदींवर भादवि कलम 143 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3)  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणी अंती न्यायालयाने सर्व अठराही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.