साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत पटकावला चौथा क्रमांक

Edited by:
Published on: May 02, 2026 14:55 PM
views 10  views

सावंतवाडी: डोंबिवली, ठाणे येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाने स्वर्गीय जान्हवी सुनील मोरे स्मृतिप्रित्यर्थ सोळा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौतीस मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर हीने उत्कृष्ट खेळ करत चौथा क्रमांक मिळवला. 


आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर यांनी उत्कृष्टरीत्या स्पर्धेचे नियोजन केले. ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी इतर जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे मुला-मुलीसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात याव्यात, असं मत ब-याच पालकांनी व्यक्त केलं. पुणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू, माजी विश्वविजेते योगेश परदेशी यांच्या हस्ते आणि ठाणे येथील आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू संजय मांडे, मंडळाचे अध्यक्ष अभय काळे, कै.जान्हवी मोरे हीचे वडील सुनील मोरे, आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार प्रसाद शेंबेकर, सह सचिव प्रदीप साटम, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत साक्षीला रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन आलेल्या कु.साक्षी रामदुरकर हीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. साक्षीसोबत उपस्थित असलेले मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅरम खेळाच्या प्रसारासाठी आणि शालेय मुला-मुलींमध्ये कॅरमची आवड निर्माण होण्यासाठी करत असलेल्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. सर्व स्तरातुन साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे.