
देवगड : नमो गार्डनसारखे प्रकल्प हे केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नसून नागरिकांना विरंगुळा देणारे आणि पर्यटनाला चालना देणारे आहेत. देवगड-जामसंडे शहर अन्य शहरांप्रमाणे मागे राहू नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नमो गार्डन ही शासनाची उत्कृष्ट संकल्पना असून प्रत्येक शहराच्या विकासात भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहरासाठी आवश्यक असलेल्या अठरा नागरी सुविधा पुरविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच असे विविध पर्यटन प्रकल्प शहरात आणले जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान सन २०२५-२६ अंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून हा अद्ययावत नमो गार्डन प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १०, नगरसेवक बुवा तारी यांच्या वार्डामध्ये आज विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. नमो गार्डन प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले, तर शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सक्शन व्हॅन उपक्रमाचाही याच वेळी शुभारंभ करण्यात आला. या दुहेरी उपक्रमामुळे शहराच्या विकासाला आणि स्वच्छतेला नवे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेवक बुवा तारी, सौ. तन्वी चांदोस्कर, शरद ठुकरुल, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळस्कर, योगेश चांदोस्कर, योगेश पाटकर, दया पाटील, विवेक खोत , यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, “देवगडमध्ये पवनचक्की गार्डनमुळे शहराच्या अर्थकारणात सकारात्मक बदल झाला. एका पर्यटन प्रकल्पामुळे शहरात किती मोठा फरक पडू शकतो, याचा अनुभव देवगडवासीयांनी घेतला आहे. देवगड-जामसंडे हे पर्यटनाच्या माध्यमातून आदर्श शहर बनण्याची पूर्ण क्षमता बाळगते. योग्य नियोजन केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो.सध्या केंद्र व राज्यात आपली सत्ता असून, तुमचा आमदारच जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी आहे. शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. लोकांचा ओघ वाढवण्यासाठी असे पर्यटनात्मक प्रकल्प आवश्यक आहेत. शहराचे महत्त्व वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.










